पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत चिकू पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन
पालघर : पालघर जिल्हयात पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना चिकू हि योजना पिकांसाठी राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
सन 2016 च्या खरीप हंगामापासून चिकू या फळपिकासाठी हवामानावर आधारीत फळ पिकविमा राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे . फळपिकांना प्रतिकुल हवामान घटकांपासून विमा संरक्षण देणे आवश्यक असल्याने सन 2020 मध्ये मृगबहाराकरीता फळपिक विमा योजना लागू करण्यात आली आहे . सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे . तरी सदर योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन चिकू पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा , असेहि आवाहन जिल्हा जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे .
कमी / जास्त पाऊस , सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य मिळणार,
फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थीतीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यात मदत मिळते
चिकू फळपिक समाविष्ट हवामान धोके व पिक संरक्षण कालावधीत- जादा आर्द्रता 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत असते,
शेतकऱ्याने भरावयाच्या फळपिक विमा हप्ता दर खालील प्रमाणे आहे विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम . यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रुपये 3000 / – विमा हप्ता भरावा लागेल . विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 30 जून 2020 आहे .
पालघर , वसई , डहाणू , तलासरी , विक्रमगड , वाडा . हे तालुके योजनेत समाविष्ट आहेत.
चिकू पिकासाठी हवामान धोके प्रमाणके ( ट्रिगर ) व नुकसान भरपाई रक्कम ( प्रति / हेक्टर ) दि . 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग 5 दिवस 90 टक्के पेक्षा जास्त राहील्यास व प्रति दिन 20 मि . मि . किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग 4 दिवस झाल्यास रु . 27000 / देय राहिल . तसेच या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग 10 दिवस 90 टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रति दिन 20 मि . मि . किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग 8 दिवस झाल्यास रु . 60000 / – देय राहिल . असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. सदर चिकू फळपिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव पत्रक भरुन रोख विमा हप्त्यासह आपले खाते असणाऱ्या बँक शाखेत मुदतीत जमा करावे . योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखा , तालुका कृषि अधिकारी व कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा . असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.