ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट… कोकणातील ‘निसर्ग’ चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची दिली माहिती ;फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची निकड… सरकारने तात्काळ उपाययोजना करण्याबाबत केल्या सूचना.
आताच शेयर करा
Jun 11, 2020

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट…

कोकणातील ‘निसर्ग’ चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची दिली माहिती ;फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची निकड…

सरकारने तात्काळ उपाययोजना करण्याबाबत केल्या सूचना…

मुंबई (वीणा देसाई )- कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसीय दौरा शरद पवार यांनी केला. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीत व स्थानिकांशी केलेल्या संभाषणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मुंबईत चर्चा केली.

या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्यास प्राधान्य देण्यात आले. सर्व भागातील नुकसान पाहता प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामे करून त्याची आकडेवारी घ्यायला हवी. यात सर्वप्रथम विद्युत व पाणी पुरवठा कसा सुरळीत करता येईल यावर भर द्यायला हवा अशी सूचना शरद पवार यांनी केली.या भागातील फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची निकड शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निदर्शनास आणली. जेणेकरून या भागातील शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल. यासाठी केंद्रसरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची वेळ आल्यास तेदेखील करावे लागेल असेही सांगितले.

चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जुनी रोजगार हमी योजना लागू करून, फळबाग लागवड योजनेशी त्याची सांगड घातल्यास हा मार्ग अधिक उपयुक्त ठरू शकेल अशी सूचनाही बैठकीदरम्यान केली.

या चक्रीवादळात घरे, बागा यांचे मोठे नुकसान झाले आहे. भिंती-छप्परे आणि झाडे पडल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. हे कचऱ्याचे ढिगारे साफ करून घरे, बागा व दुकाने स्वच्छ करावी लागतील. हे मोठे काम असल्याने यासाठी रोजगार हमी योजनेचा वापर करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

पर्यटनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दापोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा वगैरे भागात कोरोनापाठोपाठ चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज वाटते असेही स्पष्ट केले.

बहुतांश भागातील बँका बंद असल्याने नागरिकांच्या हाती पैसे नाहीत. शेती व इतर व्यवसायांचे जुन्या कर्जांचे हप्ते भरण्यासाठी तसेच नवीन कर्ज देण्यासाठी बँका सुरू होणे गरजेचे आहे. तसेच नवीन कर्ज घेताना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सवलती देता येतील का हे पाहणे जरूरी आहे अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...