प्रदीप शर्मा यांचे हात बळकट करा – रामदास आठवले.
नालासोपारा : विरार नालासोपारा तील दहशत आणि गुंडगिरी विरुद्ध लढणाऱ्या प्रदीप शर्मा यांचे हात बळकट करा असे आवाहन रामदास आठवले यांनी ऐतिहासिक सोपारा नगरीतील बौद्ध स्तुपावर आपल्या कार्यकर्त्यांना केले.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले नालासोपाऱ्यात आले होते. सायंकाळी साडेसहा वाजता बौद्ध स्तूपावर जाऊन त्यांनी भगवान गौतम बुद्धाचे दर्शन घेतले. यावेळी प्रदीप शर्मा यांच्या बरोबर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण,तालुकाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर, अजित खांबे,भाजपाचे उपाध्यक्ष मनोज पाटील, मुजफ्फर घन्सार आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित भंते यांनी प्रदीप शर्मा यांना शुभाशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर बोलताना रामदास आठवले यांनी प्रदीप शर्मा ची स्तुती केली. शर्मा हे चांगले पोलीस ऑफिसर होते. ते वसईतील दहशत आणि गुंडगिरी संपवायला आले आहेत. त्यामुळे त्यांचे हात बळकट करून त्यांना विजय मिळवून द्यावा. शर्माजी हे शिवसेनेत असले तरी हे मित्र पक्षाचे उमेदवार असल्यामुळे त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करावे.
शिवशक्ती आणि भीमशक्ती मी एकत्र आणली. त्यामुळे आता आम्ही एकमेकांचे भाऊ भाऊ झालो आहोत. असे यावेळी रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.त्यानंतर सोपारा भंडारवाडी येथून प्रदीप शर्मा यांच्या रॅलीला सुरुवात झाली शेकडो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.