
भिवंडी : श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती दुगाड फाटा भिवंडी येथे आज शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य हळदी-कुंकू समारंभास वसई विधानसभेच्या आमदार सौ.स्नेहा ताई दुबे पंडित यांची प्रमुख उपस्थित लाभली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सधवांबरोबरच विधवा महिलांचाही सन्मान करण्यात येतो. सधवा आणि विधवा असा कोणताही भेद न करता सर्व महिलांना समानतेचा अधिकार देत, स्त्री सन्मान, स्वाभिमान व सामाजिक समतेचा संदेश देणारा हा उपक्रम गेल्या २००८ सालापासून सातत्याने विविध तालुक्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.




या हळदी-कुंकू कार्यक्रमात हजारो महिलांनी एकत्र येत सधवा-विधवा असा भेद विसरून “स्त्री” या एकाच ओळखीने सहभागी होत आपल्या हक्कांचा आणि सन्मानाचा उत्सव साजरा केला. सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.
यावेळी या कार्यक्रमाला वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित,भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका नीलम पाटील, डॉ. दुमाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. आकांक्षा पंडित,श्रमजीवी संघटनेच्या ठाणे जिल्हा महिला ठिणगी प्रमुख जया पारधी, श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सागर देसक, श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारी आशा भोईर,विश्वनाथ पासारी, शेवंता पासारी, लक्ष्मी डबाळे, पार्वती पवार, कुलवंती शेलार, मंदा संवर, लक्ष्मी मुकणे, मांदिठणे सरपंच कुंदा ,आशा चौधरी, संगीता भड तसेच हजारोच्या संख्येने महिला भगिनी, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



