मीरा भाईंदरमध्ये महायुतीच्या प्रचाराला दमदार सुरुवात
विकास हाच आमचा मुख्य मुद्दा – आमदार प्रताप सरनाईक
भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील शिवसेना , भाजप , रिपाई व मित्र पक्षांच्या महायुतीचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत एक दिलाने काम करतील आणि ओवळा माजिवडा व मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात प्रचंड मतांनी महायुतीला विजय मिळेल , असा विश्वास शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. एखाद्या मुद्द्यावरून मतभेद असले तरी ते आता दूर झाले आहेत. त्यामुळे युतीत कोणतेही मनभेद नाहीत. विकासकामे हाच आमचा प्रमुख मुद्दा आहे. महायुतीमधील सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने मीरा भाईंदर शहरात प्रचार करत आहेत. त्यामुळे महायुतीला प्रचंड विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मीरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी , कार्यकर्ते यांची काल खासदार राजन विचारे , आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यात मीरा भाईंदर व ओवळा माजिवडा मतदारसंघात निवडणुकीच्या कामाला जोमाने लागण्याचे आवाहन दोघांनी केले. पक्ष पातळीवर सुरु असलेली तयारी व निवडणुकीत करावयाची कामे याबाबत कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. कोणत्याही स्थितीत कोणतेही वाद न ठेवता महायुतीचे काम प्रामाणिकपणे करावे व प्रत्येकाने आपापल्या भागात महायुतीला मताधिक्य मिळवून द्यावे असे सरनाईक व विचारे यांनी सांगितले. ओवळा माजिवडा मधून आमदार प्रताप सरनाईक व मीरा भाईंदरमधून आमदार नरेंद्र मेहता हे दोन्ही महायुतीचे उमेदवार प्रचंड लीडने निवडून येतील असा विश्वास खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला. शिवसनेच्या बैठकीनंतर सरनाईक व विचारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना सरनाईक यांनी उत्तरे दिली.
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे , देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी , भाजपचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन शिवसेना-भाजप व मित्रपक्षांची महायुती केली आहे. त्याला रिपाई व अन्य मित्रपक्षांची साथ आहे. काही वेळेस शहरात स्थानिक पातळीवर एखाद्या मुद्यावरून मतभेद होऊ शकतात. पण आमच्यात मनभेद नाहीत. आता युती झाली असून मीरा भाईंदरमध्ये महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील. शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द अंतिम आहे. त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही महायुतीचे काम प्रामाणिकपणे करीत आहोत , असे सरनाईक म्हणाले. ओवळा माजिवडा मतदारसंघात व मीरा भाईंदरमध्ये युतीचे कार्यकर्ते एकत्र प्रचार करतील व तसे आदेश सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते यांना देण्यात आले आहेत , प्रचाराला सुरुवातही चांगली झाली आहे , असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत मीरा भाईंदर शहराने राजन विचारे याना प्रचंड असे मताधिक्य दिले होते. एकट्या ओवळा माजिवडा मतदारसंघात ९३ हजारांचा लीड विचारे यांना मिळाला होता. त्यामुळे या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होईल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
लोकसभेत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केले. आता विधानसभेलाही युती झाली असल्याने मीरा भाईंदर मतदारसंघात युतीचे उमेदवार नरेंद्र मेहतांना जास्तीत जास्त मतांची आघाडी शिवसेनेच्या माध्यमातून मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू , असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. १४६ ओवळा माजिवडा मतदारसंघात शिवसेना , रिपाई तसेच भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते , सहयोगी संघटना असे सर्व एकत्र एकदिलाने प्रचाराला लागले आहेत , असेही ते म्हणाले.
विकास कामे दिसत आहेत – प्रताप सरनाईक
मीरा भाईंदर शहरात नाट्यगृहाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. घोडबंदर किल्ल्याच्या परिसरात सुशोभीकरण करण्याचे काम सुरु झाले आहे. त्याच किल्ला परिसरात भव्यदिव्य ‘शिवसृष्टी’ उभारण्याची माझी संकल्पना असून त्याचा आराखडा पूर्ण तयार आहे. त्यासाठी जवळपास ५२ कोटींच्या आसपास निधी लागणार असून तो अनुदानाच्या रूपात देण्याची तयारी माननीय मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी दर्शवली असून त्यामुळे शिवसृष्टीही मार्गी लागली आहे. भाईंदरमध्ये शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य कलादालन उभारण्यासाठी पालिकेकडून प्रशासकीय पातळीवरील तयारी झाली आहे. त्यासाठी आवश्यक निधी – अनुदान राज्य सरकारकडून मिळणार आहे. त्यासाठी खासदार राजन विचारे , आमदार रवींद्र फाटक व आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर या कलादालनाच्या कामाला सुरुवात होईल , असे सरनाईक म्हणाले. स्वतः आमदार सरनाईक हे तसेच त्या परिसरातील चारही शिवसेना नगरसेवकांनी कलादालनाच्याt कामाला आपला निधी देऊ केला आहे. राज्य सरकारकडून कलादालनाच्या कामासाठी निधी येणार आहे. मीरा भाईंदर शहराच्या वैभवात भर पडेल अशी ही सर्व मोठी विकास कामे होत आहेत, असे त्यांनी सांगितले. गेल्या १० वर्षात ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात कोणती विकास कामे झाली व कोणती पुढे होणार आहेत, कोणती कामे प्रगतीपथावर आहेत याचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला जाणार आहे , असेही त्यांनी सांगितले.
दोन्ही मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. ११ ऑक्टोबर २०१९ रोजी महायुतीचा प्रचार मेळावा सेवनस्केवर शाळेत होणार आहे. यावेळी शिवसेना नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व महायुतीचे अन्य नेते मार्गदर्शन करणार असून महायुतीची पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत.
शिवसेनेच्या पत्रकार परिषदेला खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक , जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे , युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक , अरुण कदम , शहरप्रमुख लक्ष्मण जंगम , नीलम धवन , विक्रमप्रताप सिंग , प्रवीण पाटील , हरिश्चंद्र आंगावकर यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.