वसई : वसई रोड रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला अनेक ठिकाणी भेगा गेल्या असून पुलाचे स्लॅब जागोजागी जीर्ण झाले असून सळ्या दिसू लागल्या आहेत. या पुलावरून प्रवाशांचा प्रवास सुरू असून रेल्वे प्रशासनाचे मात्र दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे. हा पूल कोसळला तर मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती अंकिता वर्तक यांनी व्यक्त केली.
वसई रेल्वे स्थानाकात पूर्व व पश्चिम तसेच फलाट क्रमांक २, ३ व ४ ला जोडणारा पादचारी पूल आहे. या पुलावरून प्रवाशांची नेहमीच वर्दळ सुरु असते. एकाच वेळी दोन्ही ठिकाणच्या फलाटावर जर ट्रेन आली, तर मोठी गर्दी या पादचारी पुलावर होत असते. मात्र हा पूल धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. ‘सध्या हा पादचारी पूल जीर्ण झाला असून कोणत्याही क्षणी हा पूल कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे, असे प्रवाशांनी सांगितले.या पुलावरील टाकण्यात आलेला स्लॅबही हळूहळू कोसळून खाली पडला असून त्याच्या मध्ये असलेल्या लोखंडी सळ्याही दिसू लागल्या आहेत. याचे फोटोसहीत दुरुस्ती करण्यासाठी वसईचे युवक अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट केले होते. त्यांनी याबाबत दखल घेवून लक्ष देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार चौकशी साठी गेलेले कुलदीप यांची स्टेशन मास्तरांनी काम सुरु असल्याचे सांगितले व तुम्ही लोकांची दिशाभूल करीत असल्याचे सांगून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या त्या आदेशाला वसई तील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असून एल्फिन्स्टन,सीएसएमटी पूल दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची वाट हे अधिकारी पाहतात का ? असा सवाल वर्तक यांनी विचारला आहे.
सकाळी व संध्याकाळच्या सुमारास या पादचारी पुलावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. काही दिवसांपूर्वी सीएसएमटी स्थानकात पूल कोसळण्याची घटना घडली होती. या पूल दुर्घटनेनंतरही वसई रोड रेल्वे स्थानकातील धोकादायक पुलाकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अंकिता वर्तक यांनी केला आहे.दरम्यान तसेच जनसंपर्क अधिकारी गजानन महतपुरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे डिव्हिजन च्या अखत्यारीत येत असून हेड कॉर्टर च्या अखत्यारीत येत नाही त्यामुळे तुम्ही डीआरएम शी संपर्क साधा असे सांगितले. मात्र डीआरएम सुनील कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.त्यामुळे अधिकृत माहिती मिळू शकली नाही.