पालघर : पालघर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीने २० जागांवर निर्विवाद विजय मिळवला असला तरी महायुतीचा गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. सोमवारी नगरपरिषदेच्या २८ जागांचे निकाल जाहीर झाले. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ.उज्ज्वला केदार काळे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार श्वेता पाटील यांचा त्यांनी पराभव केला. नगरपरिषदेसाठी रविवारी ६७ टक्के मतदान झाले होते. सर्व जागांचे निकाल हाती आल्यानंतर युतीने बाजी मारली असली तरी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे युतीची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे.
महायुतीतील शिवसेना, भाजप आणि रिपाइं या पक्षांनी पालघरची निवडणू्क प्रतिष्ठेची केली होती. महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजपचे रवींद्र चव्हाण प्रचारासाठी आले होते. त्यातच पालघरची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच नगरपरिषदेची निवडणूक होत असल्याने महायुती आणि महाआघाडीने पूर्ण ताकद पणाला लावली होती. शिवसेना १४ जागा तर भाजपने ६ जागा जिंकल्या. म्हणजेच युतीला २८ पैकी २० जागी विजयी मिळाला. तर अपक्ष- ५ ,काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-बविआ अशा आघाडीने ३ जागांवर विजय मिळाला. दरम्यान, पालघर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या युतीच्या उमेदवार श्वेता पाटील यांचा निसटता पराभव झाला.