नालासोपारा : मुंबई सारख्या शहरामध्ये सदनिका अथवा मालमत्तांचे व्यवहार करताना मालमत्ता पत्रकाचे म्हणजेच फोटो पास महत्व सर्वानाच माहीत आहे. या प्रॉपर्टी कार्ड मुळे मालमत्तांचे व्यवहार हे पारदर्शी होत असून प्रॉपर्टी टॅक्स मधून मिळणारा महसुल देखील महानगरपालिकेस योग्यरीत्या प्राप्त होतो. मात्र वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अद्यापही मालमत्तांच्या व्यवहारांमध्ये प्रॉपर्टी कार्ड लागू झालेले नाही.
वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना ३ जुलै २००९ रोजी होऊन आता त्यास ११ वर्ष उलटून गेली आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार वसई विरार या शहराची लोकसंख्या १२ लाख २२ हजार ३९० इतकी असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे ३११ चौरस किलोमीटर इतके आहे. तसेच दिवसेंदिवस या शहरामध्ये मालमत्ता संदर्भातील गैरव्यवहार व गुन्हे वाढत आहेत. एकच सदनिका अथवा मालमत्ता अनेक व्यक्तींना विकणे, एकाच सदनिका अथवा मालमत्तेवर अनेक वेळा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे अशास्वरुपाचे अनेक आर्थिक गैरव्यवहार सर्रास वसई विरार मध्ये होत असून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष म्हणजे या प्रकारांमुळे सामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची खंत शिल्पा सिंग यांनी व्यक्त केली.अशा स्वरूपाच्या मालमत्तांसंदर्भात होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी वसई विरार शहरातील मालमत्तांच्या व्यवहारामध्ये मुंबईप्रमाणे फोटो पास (प्रॉपर्टी कार्डची) पद्धत अनिवार्य करून ती सुरु करावी अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका शिल्पा सिंग यांनी वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे