नालासोपारा : (तोरा नाग ) वसई पूर्वेकडील वालीव पोलीस ठाण्यासमोरील वाहनांना दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीत ३ चारचाकी वाहने, ३२ मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वसई पोलीस ठाण्यातील जप्त वाहने भंगारात विकल्याचे प्रकरण ताजे असताना वालीव पोलीस ठाण्याच्या विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने ही आग लागली कि लावली याचा तपास पोलीस करीत आहेत. विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहनांचा लिलाव करण्याची मागणी केली जात आहे.
वालीव पोलीस ठाण्यासमोरील जप्त केलेल्या वाहनांना अचानक दुपारी १ च्या सुमारास ही आग लागली असून या आगीत ३ चारचाकी वाहने आणि ३२ मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्याचे समजताच तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेवून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेवून सुमारे १ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी काही पोलिसांच्या गाड्या सुद्धा उभ्या होत्या मात्र प्रसंगावधान राखल्याने त्या वाचल्या असून अनेक पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नुकताच वसई पोलीस ठाण्यातील जप्त केलेली वाहने पोलिसांनी भंगारात विकल्याची माहिती समोर आली असताना ही आग लागली की लावली याचा पोलीस तपास करीत आहेत. विविध पोलीस ठाण्यात अनेक वाहने पडून असून ते धोकादायक स्थितीत असून त्यांचा लिलाव करून देणे गरजेचे असून त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने अनेक वाहने आणि त्याचे सुटेभाग चोरीला गेल्याचे अनेकदा समोर आले आहे.
वसई पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात तसेच जप्त केलेली वाहने गेल्या अनेक वर्षांपासून पडून होती. या वाहनांचा लिलाव किंवा वाहन मालकांना वाहने परत करण्याचा कोणताही आदेश नसल्याची संधी साधून सात ते आठ दिवसांपूर्वी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या साथीने मुस्ताक जमिल शेख या भंगारवाल्याला १० ते १२ टन भंगार विकल्याची माहिती मिळत आहे. त्याने पहिल्या दिवशी काही भंगार घेऊन गेल्यानंतर दुसरे भंगार दाखवण्यासाठी साथीदारांना पोलीस ठाण्यात घेऊन आल्यावर पोलीस निरीक्षक नारायणराव कर्पे यांनी पाहिल्यावर विचारपूस केल्यानंतर हा भंगार घोटाळा उघडकीस आला आहे. भंगारवाला मुस्ताक याला ताब्यात घेऊन चौकशी झाल्यावर सदर भंगार नवजीवन येथे विकले असल्याचे कबूल केले असल्याचेही पोलिसांनी सांगितले.वसई पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली वाहने मुद्देमाल चक्क पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी विकल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी पोलीस वसाहतीच्या आवारात खासगी व्यक्तीने घातलेले कंपाऊंड तोडत असताना वाहने विकल्याचे समजताच कर्पे यांनी संबंधित भंगार खरेदी करणाऱ्या भंगारवाल्याला बोलावून माहिती घेतली असता ते भंगार मुद्देमाल ताब्यात असणाऱ्या महिलेने हा प्रकार केल्याचे उघड झाले असून त्या प्रकरणाची चौकशी करून तिच्यावर पोलीस आयुक्त सदानंद दाते करणार असल्याचे कर्पे यांनी सांगितले आहे.